1.महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या अठरा शाळांपैकी चौथी मुलींची शाळा माझ्या शेजारच्या ओतूर या गावी ५ डिसेंबर १८४८ रोजी सुरू झाली. पुण्यातील भिडेवाड्यातील १ जानेवारी १८४८ साली सुरू केलेल्या शाळेनंतर पुण्यातच अन्य दोन ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्यानंतर चौथी शाळा ओतूर येथे सुरू झाली. १८४८ नंतर १९५२ सालापर्यंत म्हणजे पाच वर्षात तब्बल अठरा शाळा जोतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केल्या. यावरून जोतिरावांची बहुजन मुलींच्या आणि पर्यायाने सर्वच मुलींच्या शिक्षणाबाबतची तळमळ आणि दूरदृष्टी किती मोठी होती. याचा आपल्याला अंदाज येईल. निर्दयी आणि नीच पेशवाई गेल्यानंतरच्या उगवलेल्या अमानुष आणि हिंस्त्र जातिभेदाच्या पार्श्वभूमीवर जोतिरावांनी सुरू केलेले हे कार्य रणांगणात लढणाऱ्या एखाद्या शूर योद्ध्यापेक्षाही काकणभर सरसच म्हणावे लागेल.

आज महात्मा फुले जयंतीनिमित्त ओतूर येथील शाळेला भेट दिली. भिडेवाड्यातील पहिली मुलींच्या शाळेची दुरावस्था पाहता ओतूर येथील मुलींची शाळा अत्यंत सुस्थितीत आणि आहे त्या स्थितीत तिचे व्यवस्थित जतन करण्यात आले आहे. आजही इथे मुलींचीच शाळा भरते. एकूण २८३ मुली या शाळेत शिक्षण घेत आहेत.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा सुरू केली. शाळा सुरू करताना शिक्षक म्हणून त्यांनी महिनाभर येथे वास्तव्य केले.ओतूर येथील जोतिरावांचे सहकारी, परममित्र, सत्यशोधक चळवळीच्या प्रवर्तकांपैकी एक असलेले भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांनी ही शाळा सुरू करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या शाळेचे बांधकामही भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांनीच केले. त्या काळी पुण्याहून ओतूरला येऊन मुलींची शाळा सुरू करण्याचे काम म्हणजे पुरोहितशाहीच्या वर्चस्वाला झुगारून मोठा संघर्षच होय. त्याकाळची सगळी व्यवस्था पाहता कितीतरी नद्या ओलांडून बैलगाडीच्या सहाय्याने प्रवास करून या गावात यायचे. इथे रहायचे. शाळा सुरू करायची म्हणजे किती कष्टाचे काम असेल, हे तत्कालीन काळाचा विचार केला तर आपल्याला समजते. विशेष म्हणजे एका स्रीने पुण्याहून यायचे. की जी स्वतः शिक्षिका झाल्यानंतर पुरोहितशाहीच्या, भटाबामणांच्या विरूद्ध शाळेत शहराच्या अगदी केंद्रीय मुख्य वस्तीत स्पृश्यास्पृश्य मुलींना शिकवते म्हणून अत्यंत गलिच्छ विकृतीला तोंड द्यावे लागले. तीच स्री पुण्याबाहेर पडून आणखी नव्या मुलींच्या शाळेच्या उभारणीसाठी सज्ज होते. हे तत्कालीन जगभरच्या अत्यंत क्रांतिकारी स्रियांपैकी मला वाटते हे एकमेव उदाहरण असावे. तेही विशेष म्हणजे गावात. तत्कालीन ग्रामव्यवस्थेतील जातिव्यवस्था कशी असेल याचा थोडा विचार करा. परंतु तिथेही कुणबी/शेतकरी पर्यायाने मराठा जातीतील लोक सहाय्यास पुढे येतात. निव्वळ पुढे येत नाहीत. तर हे आपले जिवितकार्य समजून शेवटपर्यंत साथ देतात. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची अशीच होय.

भाऊ पाटील यांचे वडील कोंडाजी रामजी डुंबरे पाटील हे सावित्रीबाईंना मुलीसमान मानत. त्याकाळी महात्मा फुल्यांच्या जुन्नर-ओतूर परिसरात सत्यशोधक सभा होत असत. या सभांना मूळचे राजगुरूनगरचे ‘दीनबंधू’ कार, सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष, बाॅम्बे मिल्स अँड असोसिएशनचे संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे व परिसरातील इतर वजनदार मराठे या सभांना आवर्जून उपस्थित राहत असत. त्याही काळात या सभांना दोन ते तीन हजार श्रोते उपस्थित असायचे. यावरून आपल्याला सत्यशोधक समाजाच्या चळवळीच्या प्रभावाची कल्पना येऊ शकेल. त्यावेळी भाऊ पाटील, बाळाजी कुसाजी पाटील, जुन्नरचे लक्ष्मणराव शेटे, शेख चाँद,रामचंद्र तुकाराम हेजीब,विश्राम कुशाजी पवार, रावजी मल्हारजी बोकड, चिमणाजी मथाजी डुंबरे इत्यादी महत्त्वाचे लोक जोतिरावांसोबत असायचे. अशा सभांच्या समाप्तीनंतर पुरोहिताविना, भटबामणाशिवाय सत्यशोधक पद्धतीने लग्ने लावली जायची. यापैकीच एक असलेले बाळाजी कुसाजी पाटील डुंबरे यांच्या दोन मुलींची सत्यशोधक पद्धतीने लग्ने लावण्यात आली. या विवाहामुळे ब्राह्मण पुरोहितवर्ग चिडला. ओतूरच्या पुरोहितांनी धार्मिक हक्क बुडाले म्हणून १८८४ साली बाळाजी कुसाजी यांच्या विरोधात जुन्नर कोर्टात दिवाणी दावा दाखल केला. हा अभियोग जुन्नर, पुणे, मुंबई या न्यायालयांमध्ये तब्बल सहा वर्षे चालला. सहा वर्षानंतर या अभियोगाचा निकाल सत्यशोधकांच्या पक्षाकडून लागला.

याविषयी फुले लिहितात की,

राजदस्यूची मर्जी कडकली । आर्यभटाची छाती दडपली॥

ओतूरगावी भाऊ भडकला। जुन्नरकर शेट्या धडकला॥

आर्य त्यामध्ये फुल्यास पाहती । सोवळी भांडी घेऊन पळती ॥

पत्रांमध्ये हाय हाय करिती। शंकराचार्य हाका मारिती॥

जिकडे तिकडे पोथ्या वाचिती। अज्ञान्यांची मने गोविंती॥

अहो कासी यमुनाबाई। उपाशी मरतो गे ताई॥

शिंद्यांनी फिरविली द्वाही।पोटासाठी घ्या तरी कांही॥

वरील फुल्यांच्या कवितेतून आपल्याला जुन्नर-ओतूर परिसरातील सत्यशोधक चळवळीच्या प्रभावाची कल्पना येईल.

१८७६ ला पडलेल्या दुष्काळात स्वतः सावित्रीबाईंनी कोंडाजी पाटील डुंबरे यांच्यासोबत ओतूरला गरजू लोकांना धान्याचे वाटप केले होते. तसेच प्लेगच्या साथीतही सावित्रीबाई ओतूरमध्ये अंदाजे दोन महिने राहिल्या आणि लोकांची त्यांनी सेवा केली.

ओतूरच्या डुंबरे पाटलांविषयी आणि सत्यशोधक समाजाच्या इतर सत्यशोधकांविषयी ‘सत्यशोधकांचे ओतूर’ या जी.ए.उगले यांच्या पुस्तकात अधिक माहिती.मिळेल. विस्तारभयास्तव ती इथे टाळत आहे.

महात्मा जोतिराव फुल्यांच्या इतर शाळा कुठल्या अवस्थेत आहेत माहीत नाही. परंतु ही माझ्या शेजारच्या ओतूर गावातील मुलींची शाळा अत्यंत सुस्थितीत आहे. तिचे जतनही ओतूरकरांनी तितक्याच नेटकेपणाने केले आहे. याबद्दल ओतूरकर ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे.

इतर अठरा शाळांविषयी आणि त्या शाळा सुरू होऊन जे कुणी शिक्षक सुरूवात ते शेवटपर्यंत किंवा आणखी कुठे अजूनही सुरू असतील, तर त्याविषयी अधिक जाणून घेऊन त्याचे व्हिडिओ डाॅक्युमेंट करण्याचा यापुढे प्रयत्न राहील.

जोतिराव, सावित्रीबाई आणि त्यांचे कोंडाजी डुंबरे पाटील, भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील हे किती धाडसी असतील याचा तत्कालीन काळाचा विचार केला तरी आपल्याला अंदाज येईल. अर्थात ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे अशा ज्या काही सत्यशोधक मुशीतून घडलेल्या स्रिया होत्या. त्या तर अधिक धाडसी होत्या.

तत्कालीन काळात पुण्याहून शेसव्वाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूर गावात सावित्रीबाई शिक्षक म्हणून शाळा उभारणीसाठी येतात. डुंबरे पाटलांसारखी माणसं त्यांच्यासोबत खमकेपणाने उभी राहतात. शाळेच्या बांधकाम असो, दुष्काळ असो, प्लेग असो. यात ही सगळी माणसं जीवाची बाजी लावून उभी राहतात. हा सगळा प्रवास एखाद्या महान चित्रपटाची, कथा, कादंबरीची गोष्ट होऊ शकतो. किंबहुना आहेच. काही नाटकांच्या माध्यमातून जोतिरावांना पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो न्यूनगंडग्रस्त लोकांकडूनच झाला. असे ही नाटकं अथवा एकपात्री प्रयोग पाहून वाटतात. काही लोकांनी आपल्यातील ‘अभिजन’ गिल्टला कुठेतरी विश्रांती मिळावी म्हणून असे ‘नाटकी’ प्रयत्न केले आहेत असं वाटत राहतं. जोतिराव आणि त्यांची एकूण चळवळ, त्यांचे सहकारी हे आजच्या आणि तत्कालीन काळाच्याही पुढे कैक पटीने अधिक बंडखोर होते. त्यातील परिवर्तनाच्या केंद्राचे आपण वाहक आहोत. आणि माझ्या परिसरात हा सगळा सत्यशोधकीय ठेवा आहे. याचा आनंदही आहे.

विशेष म्हणजे आजच्या चालू काळात असे एकमेकांच्या प्रती बद्ध असलेले किती लोक आहेत? हा प्रश्न पडतो. सामाजिक/प्रागतिक विचार या ना त्या कुठल्याही कारणाने पुढे नेणारांनी सगळे मतभेद, वैरभाव, उणीदुणी विसरून एकत्र येण्याच्या कालखंडात आपण आहोत. हे सर्वांनाच माहीत आहे. जोतिरावांचे आणि या सत्यशोधकीय ठेव्याचा वारस म्हणून आपण एकमेकांना कुठल्याही नकाराहोकाराशिवाय सहाय्याला पुढे येणं मला गरजेचं वाटतं. काळ जहर बनून खडा झालाय. हे सगळ्यांनाच समजतय. एकत्र येण्यासाठी आणखी कुठलं कारण हवय आता?

मित्र महेश डुंबरे आणि शाळेचे शिक्षक रवी डुंबरे यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद!

महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या शाळा.

१) भिडेवाडा पुणे – १.१.१८४८

२) महारवाडा पुणे – १५.५.१८४८

३) हडपसर पुणे – १.९.१८४८

४) ओतूर जि.पुणे – ५.१२.१८४८

५) सासवड जि.पुणे – २०.१२.१८४८

६) आल्हाटांचे घर पुणे – १.७.१८४९

७) नायगाव, ता. खंडाळा, सातारा – १५.७.१८४९

८) शिरवळ, ता. खंडाळा, सातारा – १८.७.१८४९

९) तळेगाव ढमढेरे, जि.पुणे – १.९.१८४९

१०) शिरूर, जि.पुणे – ८.९.१८४९

११) अंजीरवाडी, माजगाव – ३.३.१८५०

१२) करंजे, सातारा – ६.३.१८५०

१३) भिंगार – १९.३.१८५०

१४) मुंढवे, पुणे – १.१२.१८५०

१५) अण्णासाहेबांचा वाडा, पुणे – ३.७.१८५१

१६) नाना पेठ, पुणे – १७.९.१८५१

१७) रास्ता पेठ,पुणे – १७.९.१८५१

१८) वेताळपेठ, पुणे – १५.३.१८५२

संदर्भ – उगले जी ए, सत्यशोधकांचे ओतूर, स्वरूप प्रकाशन,औरंगाबाद, २०१० श्रीकांत ढेरंगे

Reference : Facebook page of -Junnar Tourism Development Organization 14 एप्रिल, 2022  · 

2. भुमिगत समाधी

श्री ओंकार गिरीजी यांची २५० वर्ष भुमिगत समाधी गुंजाळवाडी (बेल्हे)
जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी (बेल्हे) येथील भुमिगत समाधीला भेट देण्याचा योग आला. जुन्नर तालुक्यातील ही एकमेव भुमीगत समाधी असावी असा मला वाटते.
श्री ओंकार गिरीजी यांची भूमिगत समाधी शके १६९४ इसवी सन १७७२ नंदनानसंवत्सरे मार्गशीष शुद्ध १३ दिवशी बांधण्यात आली. ही समाधी मातीच्या भांड्यात रचण्यात आली होती. आपण जुन्नर शहराजवळील पाताळेश्र्वर मंदिर पाहिले असेलच याच पध्दतीत हे समाधीस्तल असुन पाच सहा पाय-या उतरुन आपणास आतमध्ये बसून प्रवेश करत समाधी मंडपात पोहचता येते व समाधीचे दर्शन घडते. २०२१ मध्ये माती भेंड्यांची रचना मोडकळीस आल्याने स्थानिकांच्या माध्यमातून नव्याने हे समाधीस्तल निर्माण करण्यात आले. पाय-यावर पत्र्याचे झाकण व समाधी डोमावर पत्र्याचे शेड बांधून समाधीस्तल सुरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी ३०० ते ४०० वर्षे जुन्या आठवणीतील ऐतिहासिक अनेक समाध्या पहायला मिळतात.
गुंजाळवाडी जवळच आपणास डोंगर माथ्यावर असलेले दावलमालीक बाबा व आदिनाथ महादेव बाळेश्वर मंदिर प्रसिद्ध असुन असंख्य पर्यटक येथे भेटीसाठी गर्दी करत असतात. 

Reference : Facebook page of : निसर्गरम्य जुन्नर तालुका